Degree Holders Applying for Police jobs: देशाची अवस्था समजून घ्यायची असेल तर मोठ्या भाषणांची गरज नाही. पोलीस भरतीचे फॉर्म उघडा आणि उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वाचा. चित्र स्वतःच स्पष्ट होतं.
आज पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये केवळ बारावी पास मुलं नाहीत. इंजिनिअरिंग केलेले तरुण आहेत. फार्मसी, बीएससी, एमए केलेले आहेत. काहींनी MPSC, UPSC ची तयारी केली आहे. काहींनी वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत. आणि शेवटी तेच तरुण पोलीस भरतीच्या मैदानावर धावताना दिसतात.
प्रश्न इथे पोलीस नोकरीचा नाही. पोलीस दलात जाणं चुकीचं नाही. पण प्रश्न असा आहे की इतकं उच्च शिक्षण घेतलेला तरुण शेवटी २० ते २५ हजार रुपयांच्या नोकरीसाठी रांगेत का उभा आहे. चार वर्षांचं इंजिनिअरिंग, लाखोंची फी, कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षेची तयारी… आणि शेवटी स्थैर्याच्या शोधात कोणतीही सरकारी नोकरी चालेल, ही मानसिकता का तयार होते.
आपण म्हणतो देश प्रगती करतोय. स्टार्टअप्स वाढत आहेत. डिजिटल इंडिया आहे. पण जमिनीवरचं वास्तव वेगळं आहे. खाजगी क्षेत्रात अस्थिरता आहे, पगार अनिश्चित आहेत, सुरक्षितता नाही. म्हणून तरुणाला शेवटी “सरकारी” शब्दातच सुरक्षितता दिसते. मग तो डॉक्टर असो, इंजिनिअर असो किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा.
ही परिस्थिती केवळ बेरोजगारीची नाही, तर दिशाहीन शिक्षण व्यवस्थेची आहे. शिक्षण घेताना विद्यार्थ्याला सांगितलं जातं मोठं व्हा, पुढे जा, करिअर घडवा. पण प्रत्यक्षात संधी मर्यादित आहेत. जागा कमी, उमेदवार लाखोंमध्ये. मग तरुण काय करणार. त्याच्याकडे पर्याय उरत नाही.
याहून गंभीर गोष्ट म्हणजे या प्रक्रियेत तरुणाची मानसिक अवस्था ढासळते. घरच्यांची अपेक्षा, समाजाचा दबाव, वय वाढतंय ही भीती. त्यामुळे कोणतीही स्थिर नोकरी मिळाली तरी पुरे, असा विचार तयार होतो. स्वप्नं लहान होत जातात, फक्त खात्रीची नोकरी मोठी वाटू लागते.
देशाची खरी अवस्था GDP मध्ये दिसत नाही. ती भरतीच्या मैदानावर दिसते. हजारो पदवीधर एका साध्या सरकारी पदासाठी धावताना दिसतात, तेव्हा कळतं की प्रश्न केवळ नोकरीचा नाही, तर संधींच्या कमतरतेचा आहे.
ही टीका पोलीस दलावर नाही. ही टीका त्या व्यवस्थेवर आहे जी तरुणाला वर्षानुवर्षे अभ्यास करायला लावते, पण शेवटी त्याला योग्य संधी देऊ शकत नाही. जर उच्च शिक्षित तरुणाला त्याच्या शिक्षणानुसार काम मिळत नसेल, तर कुठेतरी आपण चुकतोय हे मान्य करावंच लागेल.
रोखठोक बोलायचं तर, देशाचं भविष्य भरतीच्या मैदानावर धावत आहे. आणि त्या मैदानात उभं राहून जर आपण फक्त संख्या पाहत राहिलो, तर समस्या कधीच सुटणार नाही. प्रश्न विचारायला लागेल. शिक्षणाचं आणि रोजगाराचं नातं पुन्हा तपासायला लागेल. नाहीतर उद्या ही रांग आणखी लांब होणार आहे.
मी गेल्या 10+ वर्षांपासून Banking, Government Schemes, RTO, Property आणि Online Application संबंधित खऱ्या समस्यांवर सोपे व practical उपाय देण्याचं काम करतो. सामान्य लोकांना गुंतागुंतीच्या प्रक्रिया सोप्या मराठीत समजावणे हा माझा मुख्य उद्देश आहे.