शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरक्षित आहे का?

आपल्या आजूबाजूला शेअर मार्केट बद्दल दोन टोकाची मतं ऐकायला मिळतात. काही लोक म्हणतात “शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे, त्यात पैसे घातले की बुडतात.” तर काहीजण सांगतात “शेअर मार्केटमुळेच लोक करोडपती झाले.” मग सामान्य माणसाच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे खरंच सुरक्षित आहे का?

हा प्रश्न समजून घ्यायचा असेल तर आधी एक साधं उदाहरण पाहूया.

समजा तुमच्या गावात एक चांगलं चालणारं दुकान आहे. त्या दुकानाचा मालक म्हणतो की मला दुकान मोठं करायचं आहे, पण माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. म्हणून तो काही लोकांकडून पैसे घेतो आणि त्याबदल्यात दुकानात थोडासा हिस्सा देतो. आता दुकानाचा व्यवसाय वाढला तर त्या पैशांचा फायदा त्या गुंतवणूकदारांनाही होतो. आणि व्यवसायात तोटा झाला तर त्याचा परिणाम त्यांच्यावरही होतो.

शेअर मार्केटही याच तत्त्वावर चालतं. मोठ्या कंपन्या आपला व्यवसाय वाढवण्यासाठी लोकांकडून पैसे उभे करतात आणि त्याबदल्यात शेअर्स देतात. म्हणजेच तुम्ही शेअर घेतला तर तुम्ही त्या कंपनीचे छोट्या प्रमाणात भागीदार होता.

मग धोका कुठे आहे?

धोका शेअर मार्केटमध्ये नसतो, तर आपण कसे गुंतवणूक करतो यात असतो.

अनेक लोक काय करतात कोणीतरी सांगितलं म्हणून शेअर घेतात, WhatsApp tip वर पैसे टाकतात, पटकन नफा मिळवण्याच्या लालसेने ट्रेडिंग करतात. इथेच नुकसान सुरू होतं. कारण माहिती नसताना केलेली गुंतवणूक ही गुंतवणूक नसते, ती अंदाज असतो.

पण दुसरीकडे जे लोक अभ्यास करून, कंपनीची माहिती पाहून, दीर्घकालीन विचार करून गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी शेअर मार्केट ही संपत्ती निर्माण करण्याची संधी ठरते.

SIP म्हणजे काय आणि ती सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाने समजून घ्यायला हवी अशी खरी गोष्ट

आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे बँकेत पैसे ठेवले तर सुरक्षित वाटतात, पण त्यावर मिळणारा व्याजदर अनेकदा महागाईपेक्षा कमी असतो. म्हणजे पैसे सुरक्षित असले तरी त्यांची खरी किंमत हळूहळू कमी होत असते. शेअर मार्केटमध्ये चढउतार असतात, पण दीर्घकाळात चांगल्या कंपन्यांनी चांगला परतावा दिल्याची अनेक उदाहरणे आहेत.

म्हणजे शेअर मार्केट सुरक्षित आहे का याचं खरं उत्तर असं आहे:

ज्ञानाशिवाय गुंतवणूक केली तर शेअर मार्केट धोकादायक आहे.
माहिती आणि संयम ठेवून गुंतवणूक केली तर शेअर मार्केट एक संधी आहे.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट शेअर मार्केटमध्ये कधीही उधार पैसे किंवा गरजेचे पैसे गुंतवू नयेत. जे पैसे काही वर्षे न वापरता ठेवू शकतो, तेच गुंतवले तर मानसिक ताण कमी होतो.

शेवटी प्रश्न शेअर मार्केटचा नाही, तर आपल्या दृष्टिकोनाचा आहे. पटकन पैसा कमवायचा असेल तर ते धोकादायक वाटेल. पण हळूहळू संपत्ती तयार करायची असेल तर ते एक साधन बनू शकतं.

म्हणून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरक्षित आहे का हा प्रश्न विचारण्यापेक्षा कदाचित आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा मी गुंतवणूक करण्यापूर्वी किती शिकलो आहे?

कारण शेअर मार्केटमध्ये पैसे घालण्यापूर्वी ज्ञानात गुंतवणूक केली, तरच पैसे सुरक्षित राहण्याची शक्यता वाढते.

1 thought on “शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरक्षित आहे का?”

Leave a Comment