Mulila vadiloparjit malmattet kiti hakk ahe: अजूनही अनेक ठिकाणी एक गैरसमज खूप ठामपणे लोकांच्या मनात बसलेला आहे- मुलीला लग्न झाल्यावर वडिलांच्या मालमत्तेत काही हक्क राहत नाही. काहीजण तर अजूनही म्हणतात “मुलीला लग्नात दिलं तेच तिचं.” पण कायदा काय सांगतो हे फार कमी लोकांना माहिती असतं.
हा विषय समजून घ्यायचा असेल तर आधी एक साधी परिस्थिती समजून घेऊया.
समजा एका वडिलांकडे वडिलोपार्जित जमीन आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालं आहे आणि ती दुसऱ्या घरी राहते. वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्तेचा प्रश्न उभा राहतो. अनेक वेळा नातेवाईक किंवा समाजातील लोक सांगतात की जमीन मुलालाच मिळेल. मुलगी स्वतःही कधी कधी वाद नको म्हणून मागे हटते.
पण इथे कायदा स्पष्ट आहे.
हिंदू वारसा कायदा (Hindu Succession Act) 2005 मध्ये झालेल्या सुधारणेनुसार मुलीला मुलासारखाच वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क आहे.
याचा साधा अर्थ असा आहे की:
मुलगा जसा जन्मतःच वडिलोपार्जित मालमत्तेचा भागीदार असतो, तशीच मुलगीही असते. तिचं लग्न झालं किंवा ती दुसरीकडे राहत असली तरी तिचा हक्क संपत नाही.
सुप्रीम कोर्टाने 2020 मध्ये दिलेल्या निर्णयातही ही गोष्ट पुन्हा स्पष्ट केली की मुलीचा हक्क हा जन्मापासून असतो, वडील जिवंत होते की नाही यावर तो अवलंबून नसतो.
म्हणजे:
जर कुटुंबात वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर:
- मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान हिस्सा मिळतो
- लग्न झालं म्हणून मुलीचा हक्क संपत नाही
- मुलगी हिस्सा मागू शकते
- ती कायदेशीर वाटणी (partition) मागू शकते
पण एक गोष्ट इथे समजून घेणं खूप महत्वाचं आहे.
हे पण वाचा:- Aarthik Sankat ke Upay: आर्थिक संकट आल्यास काय करावे?
वडिलोपार्जित मालमत्ता आणि स्वतः कमावलेली मालमत्ता वेगळी असते.
जर वडिलांनी स्वतःच्या कमाईतून मालमत्ता घेतली असेल तर ते त्यांच्या आयुष्यात ती कोणालाही देऊ शकतात किंवा वसीयत (Will) करू शकतात. पण वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत मुलीचा हक्क कायद्याने संरक्षित आहे.
अनेक वेळा मुली स्वतःहून हक्क सोडतात कधी भावासाठी, कधी नातेसंबंध टिकवण्यासाठी, कधी माहिती नसल्यामुळे. पण हक्क सोडायचा असेल तरी तो कायदेशीर पद्धतीने (release deed) करावा लागतो. तोंडी सांगितल्याने हक्क संपत नाही.
या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट स्पष्ट होते प्रश्न मुलीला हक्क आहे का नाही हा नाही. प्रश्न आहे आपल्याला कायद्याची माहिती आहे का नाही.
कारण माहिती नसल्यामुळे अनेक वेळा लोक आपला हक्क गमावतात.
म्हणून प्रत्येक मुलीने आणि प्रत्येक कुटुंबाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की वडिलोपार्जित मालमत्तेत मुलगी ही पाहुणी नसते, तीही तितकीच हक्काची वारस असते.
मी गेल्या 10+ वर्षांपासून Banking, Government Schemes, RTO, Property आणि Online Application संबंधित खऱ्या समस्यांवर सोपे व practical उपाय देण्याचं काम करतो. सामान्य लोकांना गुंतागुंतीच्या प्रक्रिया सोप्या मराठीत समजावणे हा माझा मुख्य उद्देश आहे.
1 thought on “मुलीला वडिलोपार्जित मालमत्तेत किती हक्क आहे?”