About Us

नमस्कार, मी Raj Dhanve.

मी लेखक आहे असं म्हणण्यापेक्षा मला स्वतःला लोकांचे प्रश्न आणि समस्या समजून घेणारा माणूस म्हणून घ्यायला जास्त आवडेल. कारण मी जे लिहितो ते फक्त इंटरनेटवरून माहिती शोधून कॉपी पेस्ट केलेलं नसतं. मला आयुष्यात ज्या समस्या स्वतःला भेडसावल्या, ज्या अडचणी मी अनुभवल्या, त्यातूनच माझं लेखन तयार होतं.

एखादी समस्या समोर आली की ती वरवर पाहून मी लिहित नाही. त्या समस्येचा अभ्यास करतो, ती नेमकी का येते हे समजून घेतो आणि मग ती लवकर, सोप्या आणि योग्य पद्धतीने कशी सुटू शकते याचा विचार करून लिहितो. कारण वाचकाला फक्त माहिती नको असते, तर त्याच्या समस्येवर एक खराखुरा आणि खात्रीशीर उपाय हवा असतो.

मी खूप वर्षांपासून लिहितोय…. नेमकं कधीपासून हे सांगता येणार नाही… कारण सुरुवात लेखनाने नाही, तर मला पडणाऱ्या प्रश्नांनी आणि मी स्वतः अनुभवलेल्या समस्यांनी झाली…

मला कोणत्या समस्या आल्या?

एखाद्या कामासाठी बँकेत दिवसभर रांगेत उभा राहूनही काम होत नव्हतं… माहिती विचारली तर कोणी नीट उत्तर देत नव्हतं. अकाउंटमधून गरज नसताना चार्जेस कापले गेले, काही कारण नसताना अकाउंट बंद केलं गेलं… पण का आणि कशासाठी हे कोणीच सांगायला तयार नव्हतं. ऑनलाइन व्यवहार करताना अनेकदा फसवणूक झाली, तक्रार केली तरी कोणी दखल घेतली नाही.

ग्रामपंचायतीत समस्या घेऊन गेलो तर अर्ज घेतले जात नव्हते, म्हणून माहिती अधिकाराखाली अर्ज केला… पण पुढची प्रक्रिया माहीत नसल्यामुळे तो अर्ज तसाच धूळ खात पडून राहिला. सरकारी योजनांची माहिती वेळेवर मिळत नव्हती, आणि मिळालीच तर अर्जाची तारीख निघून गेलेली असायची. कधी अर्ज केला तरी एखाद्या छोट्याशा चुकीमुळे तो रिजेक्ट झाला आणि मला त्या योजनेचा लाभ मिळाला नाही.

ऑनलाइन फॉर्म भरताना Error यायचा, पण नेमकं चुकतंय काय हे समजायचंच नाही… ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं होतं, पॅन कार्ड कसं मिळतं याची साधी माहिती कोणी दिली नाही. त्यासाठी मला हेलपाटे मारावे लागले… नोकरीच्या शोधात असताना योग्य माहिती न मिळाल्यामुळे संधी हातातून गेल्या… घर घेताना प्रक्रिया माहीत नसल्यामुळे छोट्या छोट्या कामांसाठी लोकांनी पैसे घेतले… शेती नावावर करण्यासाठी दिवसेंदिवस सरकारी कार्यालयात चकरा मारल्या.

CIBIL खराब झाला, त्यामुळे नवीन कर्ज मिळालं नाही. मिळालं तरी व्याजदर जास्त होता. कर्ज देणाऱ्या कर्मचाऱ्याने घेतलेले पैसे नेमके कशासाठी होते हे मला कळलंच नाही. मी कर्ज वेळेत भरत होतो तरीही माझा CIBIL खराब का झाला, तो कसा सुधारायचा… हे साध्या भाषेत सांगणारा कोणीच नव्हतं. या सगळ्या अनुभवांतूनच मला एक गोष्ट कळत गेली… समस्या आपली एकट्याचीच नाही, पण त्यावर योग्य आणि सोपा उपाय कुणी सांगत नाही. आणि इथूनच माझ्या लेखनाची खरी सुरुवात झाली.

हे सगळं मी स्वतः अनुभवलं आहे… गरज नसताना सरकारी कार्यालयात फेऱ्या मारल्या आहेत, छोट्या कामासाठी दिवस भर बँकेत बसून वेळ वाया घातलाय, चुका केल्या आहेत…आणि त्यामुळेच हळूहळू गोष्टी समजत गेल्या.

तेव्हाच ठरवलं, आता आपल्याला जे समजलं ते आपल्यापुरतं ठेवायचं नाही. Saralupay.in ही वेबसाईट याच विचारातून जन्माला आली.

या वेबसाईट वर तुम्हाला फक्त गप्पा मारून जाहिराती दाखवल्या जाणार नाहीत, इथे तुम्हाला “तज्ञ असं म्हणतात” असं लिहिलेलं कमी आणि “हे असं करा, इथे अडचण येते, इथं लक्ष ठेवा” असं जास्त दिसेल.

मी इथे काय लिहितो?

मी इथे काय लिहितो हे सांगायचं झालं तर उत्तर एकच आहे… रोजच्या आयुष्यात माणसाला अडवणाऱ्या गोष्टी.
मी इथे बँकिंगशी संबंधित समस्या लिहितो. CIBIL, कर्ज, खाते, ATM, ऑनलाइन फ्रॉड याबद्दल साध्या भाषेत सांगतो. सरकारी योजना नेमक्या कोणासाठी आहेत, अर्ज कसा भरायचा, कुठे काय अडतं, चूक कुठे होते हे स्पष्ट करून लिहितो. RTO, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार अशा विषयांवर लोकांना जे समजत नाही ते सोप्या शब्दांत मांडतो. जमीन, कागदपत्रं, प्रक्रिया… ज्या गोष्टी सामान्य माणसाला गुंतागुंतीच्या वाटतात त्या उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतो.

मी इथे फक्त माहिती देत नाही…
मी ती समजावून सांगतो.
कारण माझ्यासाठी वाचक म्हणजे एखादा आकडा नाही. तो माझ्यासारखाच एखादा सामान्य माणूस आहे, जो उत्तर शोधतोय.

मी कोणासाठी लिहितो हे मला नेहमी स्पष्ट असतं.

मी त्या माणसासाठी लिहितो जो Google वर प्रश्न टाकतो आणि दहा वेबसाईट वाचूनही अजून गोंधळलेला असतो.
मी त्या माणसासाठी लिहितो जो पहिल्यांदाच अर्ज भरतोय आणि एखादी चूक होईल याची भीती मनात ठेवून बसलेला असतो… मी त्या माणसासाठी लिहितो जो शिकलेला आहे, हुशार आहे… पण सिस्टम त्याला सतत गोंधळात टाकते.

कोणतीही माहिती लिहताना ती मी स्वतः आधी समजून घेतो. रिसर्च करून, वेगवेगळे स्रोत पाहून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाचकाला याचा खरंच उपयोग होईल का हे तपासूनच लिहितो. जर इथला एखादा लेख वाचून तुमचं काम थोडं सोपं झालं, एखादी चूक टळली, वेळ वाचला, पैसे वाचला, श्रम वाचले किंवा एखाद्या निर्णयाबद्दल आत्मविश्वास वाढला… तर मला वाटतं मी जे लिहितोय त्याला अर्थ आहे.

तुम्हाला काही विचारायचं असेल, एखादी अडचण सांगायची असेल किंवा काही सूचना द्यायच्या असतील तर नक्की संपर्क करा.

मी कोण आहे?

माझं नाव- Raj Dhanve आहे.
Email
rajdhanveofficial@gmail.com / shrhjadav@gmail.com
Mobile – 8378908271
पत्ता – श्रीकृष्ण नगर, चिखली, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र. पिन – 443201

आम्हाला आमच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर फॉलो करायला विसरू नका.

तसेच मराठी कोरा (QUORA) या प्लॅटफॉर्म वर माझ्या पोस्ट आणि प्रश्नोत्तरे पाहायला देखील विसरू नका.

Saralupay.in वर भेट देऊन तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याबद्दल जाणून घेतले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!