नमस्कार मित्रांनो, saralupay.in वर आज हा माझा पहिला लेख! पण या लेखात उपाय सांगणार नसून भ्रष्टाचार उघड करणे हा उपाय नसून उघड करणाऱ्यासाठी कशी एक समस्या बनते याबद्दल सांगणार आहे. ज्या समस्यांचा मी स्वतः सामना केला आहे. त्यावर योग्य उपाय काय असेल हे मी तुमच्यावरच सोडतो…!
कारण आजकाल भ्रष्टाचार उघड करणे म्हणजे स्वतःची बदनामी करून घेण्यासारखे झाले आहे, कारण एका बाजूला तुम्ही एकटे सत्य बाहेर आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असता, आणि दुसऱ्या बाजूला पन्नास लोकांची डोकी तुम्हाला खोटं ठरवायला तयार असतात. त्यामुळे तुमचे खरे हे खरे नसून खोटे कसे आहे हेच जनतेपुढे ठेवलं जातं. त्यात अत्यंत खालच्या थराला जाऊन राजकारण करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. भ्रष्टाचार करणाऱ्यावर नव्हे, तर तो उघड करणाऱ्यावरच होणारे हल्ले, सामाजिक दबाव, बदनामी हे आता ठरलेलं समीकरण झालं आहे. आणि जनता पण हळूहळू हेच सत्य मानायला लागते.
याचं कारण भ्रष्टाचार वाढलाय म्हणून नाही, तर सत्य सहन करण्याची समाजाची ताकद कमी झाली आहे. आज सत्य हे पुराव्यावर नव्हे, तर नॅरेटिव्हवर ठरतं. कोणाचा आवाज मोठा आहे, कोणाकडे किती संपत्ती आहे, कोणाचं सोशल मीडियावर नेटवर्क आहे, कोणाला टीआरपी मिळते, यावर सत्याचं वजन मोजलं जातं. त्यामुळे पुरावे, कागदपत्रं, आकडे, ऑडिट रिपोर्ट्स हे दुय्यम ठरतात, आणि संशय, अफवा, चार व्हिडीओ क्लिप्स आणि ट्रोलिंग यांना अग्रक्रम मिळतो.
भ्रष्टाचार उघड करणं आज गुन्हा का ठरतंय? सत्य एकटं का पाडलं जातंय…
भ्रष्टाचार उघड करणारा व्यक्ती आधी हिरो असतो, पण फार काळ नाही. काही दिवसांतच तो संशयाच्या भोवऱ्यात अडकतो. यामागे कोण आहे, याचा अजेंडा काय, याला अचानक इतकी माहिती कशी मिळाली, असे प्रश्न विचारले जातात. पण गंमत म्हणजे ज्याच्यावर आरोप आहेत, त्याला हेच प्रश्न क्वचितच विचारले जातात. तिथे मात्र मौन असतं.
आपल्या मराठीत एक म्हण आहे:
“सत्याचा विजय होतो, पण त्याला वेळ लागतो.”
पण आजच्या या सोशल मीडियाच्या युगात सत्याला वेळ मिळतोच कुठे? एखादा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी एखादा पत्रकार, कार्यकर्ता किंवा सर्वसामान्य नागरिक पुरावा गोळा करतो, त्यासाठी जीवावर उदार होतो, कागदपत्रे शोधतो, साक्षीदारांना बोलते करतो. पण जेव्हा ते सत्य बाहेर येते, तेव्हा भ्रष्टाचाराच्या लाभार्थ्यांची एक संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. त्यांचं एकच ध्येय असते: सत्याला खोटे ठरवणे.
आजचा काळ असा आहे की एखाद्याचं चारित्र्य संपवणं हे त्याचे मुद्दे खोडून काढण्यापेक्षा सोपं झालं आहे. आरोपांना उत्तर द्यायचं नाही, पुरावे दाखवायचे नाहीत. फक्त आरोप करणाऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोकवायचं. त्याचे जुने फोटो, जुनी वक्तव्यं, त्याचे नातेवाईक, त्याची राजकीय मते, सगळं बाहेर काढून हा माणूसच संशयास्पद आहे, त्याला कोणी विचारात नाही, त्याच्या बोलण्याला काही अर्थ नाही असं जनतेच्या तसेच त्याच्या नातेवाईकाच्या मनावर ठसवायचं. आणि त्याला त्याच्याच लोकांपुढे विरुद्ध उभे करायचं, त्याच्या चुका या ठळक केल्या जातात. एकदा का माणूस संशयास्पद ठरला की त्याचं म्हणणं आपोआपच संशयास्पद ठरतं.
सोशल मीडियाचा वेग, सत्याचा श्वास
सोशल मीडिया या सगळ्याला वेग देते. इथे तथ्यांपेक्षा भावना जलद पसरतात. राग, द्वेष, टोमणे, उपहास हे सगळं व्हायरल होतं. सत्य मात्र संथ असतं. त्याला वेळ लागतो, तपास लागतो, संयम लागतो. पण आजचा समाज संयमाचा नाही, तर तत्काळ निकालांचा आहे. त्यामुळे काहीतरी असेल म्हणूनच बोलतोय ही ओळ जास्त विश्वासार्ह वाटते, हे सिद्ध झालंय यापेक्षा.
यात सगळ्यात मोठं नुकसान होतं ते लोकशाहीचं. कारण लोकशाहीचा कणा हा प्रश्न विचारण्यात असतो. पण जेव्हा प्रश्न विचारणाऱ्यालाच शिक्षा मिळू लागते, तेव्हा उरलेले गप्प बसतात. आपल्याला काय करायचंय ही भावना बळावते. आणि जिथे समाज गप्प बसतो, तिथे भ्रष्टाचार निर्भय होतो. कारण त्याला माहित असतं की धोका पुराव्याचा नाही, धोका बोलणाऱ्याचा आहे.
इतिहास काय सांगतो?
इतिहास साक्षी आहे की आज जे लोक बदनाम केले जातात, त्यांच्याच नावाने उद्या पुस्तकं लिहिली जातात. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. नुकसान झालेलं असतं. विश्वास तुटलेला असतो. आणि समाज एक पाऊल मागे गेलेला असतो.
म्हणूनच प्रश्न भ्रष्टाचाराचा नाही, प्रश्न आपल्या भूमिकेचा आहे. उद्या जेव्हा कुणी काही उघड करेल, तेव्हा आपण तो कोण आहे? हे विचारण्याआधी तो काय म्हणतोय? हे विचारणार आहोत का? आपण आवाजाकडे पाहणार आहोत की पुराव्याकडे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या तो आवाज आपलाच असेल, तर आपल्यासाठी कुणी उभं राहील का?
भ्रष्टाचार उघड करणं आज धाडसाचं काम बनलं आहे. पण ते धाडस जर समाजाने पाठबळ दिलं नाही, तर सत्य एकटं पडतं. आणि एकटं पडलेलं सत्य कितीही मजबूत असलं, तरी या सो-कॉल्ड राजकारण्यांच्या गोंगाटात हरवून जातं.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं…..
“सत्य कधीही सोयीचं नसतं, पण त्याशिवाय समाज टिकत नाही.”
आणि जर आपण आज सत्याच्या बाजूने उभे राहिलो नाही, तर उद्या खोट्याच्या गर्दीत आपलाच आवाज ओळखू येणार नाही.
हा लेख वाचून जर तुमच्या मनात थोडीशी तरी अस्वस्थता निर्माण झाली असेल… एखादा प्रश्न डोक्यात रेंगाळत असेल…
किंवा “हे खरंच आहे” असं वाटलं असेल… तर समजा हा लेख त्याच्या उद्देशापर्यंत पोहोचला.
अशाच प्रश्नांवर, अशाच अस्वस्थ करणाऱ्या सत्यांवर मी सतत लिहित राहतो. माझं लिखाण आवडलं असेल
तर Quora आणि Facebook वर मला नक्की follow करा.
कारण प्रश्न विचारणं थांबवलं
की उत्तरं आपोआपच गायब होतात…!
मी गेल्या 10+ वर्षांपासून Banking, Government Schemes, RTO, Property आणि Online Application संबंधित खऱ्या समस्यांवर सोपे व practical उपाय देण्याचं काम करतो. सामान्य लोकांना गुंतागुंतीच्या प्रक्रिया सोप्या मराठीत समजावणे हा माझा मुख्य उद्देश आहे.
1 thought on “भ्रष्टाचार उघड करणं आज गुन्हा का ठरतंय? सत्य एकटं का पाडलं जातंय…?”