EMI Bounce Charges: घरगुती गरजा, मोबाईल, टीव्ही किंवा इतर वस्तूंसाठी अनेक जण बजाज फायनान्सकडून कर्ज घेतात. मीही त्यातलाच एक. पण एकदा असा अनुभव आला की कर्ज घेतल्यापेक्षा जास्त मानसिक त्रास सहन करावा लागला. हा लेख मी माहिती म्हणून नाही, तर स्वतः अनुभवलेल्या घटनेतून लिहतोय.
माझा बजाज फायनान्सचा हप्ता दर महिन्याला ठरलेल्या तारखेला असतो. त्या दिवशी माझ्या बँक अकाउंटमध्ये पुरेसे पैसे असतात. त्या तारखेला ना रविवार होता, ना बँक सुट्टी. तरीही त्या महिन्यात माझ्या अकाउंटमधून EMI कट झाला नाही.
सुरुवातीला मला काहीच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी अचानक मेसेज आला की तुमचा EMI बाऊन्स झाला आहे आणि त्यावर बाऊन्स चार्ज लावण्यात आला आहे. हा मेसेज वाचून मला धक्का बसला. कारण पैसे अकाउंटमध्ये होते, मग बाऊन्स हफ्ता बाउंस कसा काय झाला?
मी लगेच बँकेत गेलो आणि अकाउंट स्टेटमेंट काढलं. स्टेटमेंटमध्ये स्पष्ट दिसत होतं की त्या तारखेला माझ्या खात्यात पुरेशी रक्कम होती आणि कोणताही बाऊन्स झालेला नव्हता. म्हणजेच चूक माझी नव्हती.
हे सगळं पुरावे घेऊन मी बजाज फायनान्सला मेल केला. बँक स्टेटमेंट जोडून सांगितलं की EMI कट न होणं ही तुमची चूक आहे, माझी नाही. पण मेल करूनही काहीच उत्तर आलं नाही. ना कॉल, ना रिप्लाय. उलट काही वेळाने परत मेसेज येऊ लागले की लेट फी भरा, नाहीतर पुढील कारवाई केली जाईल.
याच दरम्यान मला माझ्यासारखाच अनुभव आलेल्या एका व्यक्तीची माहिती मिळाली. त्यांनी बजाज फायनान्समधून मोबाईल घेतला होता. त्यांच्या अकाउंटमधून EMI कट झाला होता, तरीही बजाज फायनान्सकडून मेसेज आला की हप्ता भरलेला नाही. त्यांनी बँक स्टेटमेंट दाखवलं तरी फायनान्स कंपनी ऐकून घ्यायला तयार नव्हती. उलट त्यांच्यावर तोच हप्ता पुन्हा आणि 500 रुपये लेट फी (Penalty) लावण्यात आली. आणि फी नाही भरली तर मोबाईल नंबर ब्लॉक करू असे सांगितले.
शेवटी वैतागून त्यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली. बँक स्टेटमेंट आणि फायनान्सकडून आलेले मेसेज हे पुरावे म्हणून दिले. काही दिवसांतच ग्राहक न्यायालयाने बजाज फायनान्सला नोटीस पाठवली.
नोटीस गेल्यानंतर मात्र सगळा सूर बदलला. बजाज फायनान्सने चूक मान्य केली, माफी मागितली आणि लेट फी रद्द केली. हप्ता क्लिअर करण्यात आला. मोबाईल लॉक करण्याची धमकी देणारे मेसेज देखील थांबले.
या अनुभवातून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. काही वेळा फायनान्स कंपन्या स्वतः EMI कट करत नाहीत आणि नंतर त्याचाच दंड ग्राहकाकडून वसूल करतात. अनेक ग्राहक CIBIL Score खराब होईल म्हणून घाबरून पैसे भरून टाकतात आणि विषय संपवतात.
जर तुमच्याबरोबर बजाज फायनान्स किंवा कोणत्याही फायनान्स कंपनीकडून असा प्रकार झाला असेल, तर सगळ्यात आधी बँकेत जाऊन अधिकृत स्टेटमेंट काढा. हाच तुमचा सर्वात महत्वाचा पुरावा असतो. त्यानंतर फायनान्स कंपनीला मेल करा आणि स्टेटमेंट जोडून द्या.
तरीही जर ते ऐकून घेत नसतील, तर त्यांच्या grievance विभागात तक्रार नोंदवा. आणि तरीही अन्याय होत असेल, तर ग्राहक न्यायालयाची मदत घ्यायला अजिबात घाबरू नका. तक्रार करणं अवघड नाही आणि खर्चही फारसा नसतो.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा चुकीमुळे तुमचा CIBIL स्कोर खराब होऊ देऊ नका. वेळेत आवाज उठवला, योग्य पुरावे दिले, तर मोठ्या फायनान्स कंपन्याही चूक मान्य करतात.
मी हा अनुभव लिहायचं एकच कारण आहे. तुमच्यावर अन्याय होत असेल, तर गप्प बसू नका. प्रश्न समजून घ्या, पुरावे जमा करा आणि गरज पडली तर कायदेशीर मार्ग निवडा. योग्य मार्ग निवडला, तर निकाल तुमच्याच बाजूने लागतो.
मी गेल्या 10+ वर्षांपासून Banking, Government Schemes, RTO, Property आणि Online Application संबंधित खऱ्या समस्यांवर सोपे व practical उपाय देण्याचं काम करतो. सामान्य लोकांना गुंतागुंतीच्या प्रक्रिया सोप्या मराठीत समजावणे हा माझा मुख्य उद्देश आहे.
1 thought on “तुमच्या अकाउंटमध्ये पैसे असूनही EMI कट झाला नाही… आणि वरून बाऊन्स चार्ज लावला गेला, असं कधी झालंय का?”