बेकायदेशीर ताबा (illegal possession) ही फक्त जमीन किंवा घराची समस्या नसते, ती मानसिक त्रास देणारी परिस्थिती असते. आपलीच मालमत्ता असताना दुसरा कुणीतरी ताबा घेतो आणि आपण काही करू शकत नाही असं वाटायला लागतं. पण अशा वेळी घाबरण्यापेक्षा कायदेशीर पद्धतीने पावले उचलणे महत्त्वाचे असते.
सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट असावी. भावना वेगळ्या आणि कायदा वेगळा. रागाच्या भरात स्वतः जाऊन ताबा काढण्याचा प्रयत्न केला तर उलट तुमच्यावरच केस होऊ शकते. त्यामुळे कायद्याच्या मार्गानेच पुढे जाणे सुरक्षित असते.
पहिलं काम म्हणजे तुमचे मालकी हक्काचे पुरावे तयार ठेवणे. ७/१२ उतारा, ८अ, खरेदीखत (Sale Deed), फेरफार नोंद, मालमत्ता कर पावत्या, वीज बिल, ग्रामपंचायत नोंद – जे काही कागद तुमच्याकडे आहेत ते व्यवस्थित एकत्र ठेवा. कारण पुढे कोणतीही तक्रार करताना हेच सर्वात मोठे शस्त्र असते.
दुसरी गोष्ट म्हणजे अधिकृत मोजणी करून घेणे. अनेक वेळा सीमा स्पष्ट नसल्यामुळे वाद निर्माण होतात. तलाठी किंवा भूमापन विभागाकडून अधिकृत मोजणी करून घेतली तर खरे वास्तव स्पष्ट होते. मोजणीचा पंचनामा आणि नकाशा पुढे खूप उपयोगी पडतो.
तिसरं पाऊल म्हणजे लेखी तक्रार. संबंधित पोलीस स्टेशन, तलाठी, तहसीलदार किंवा एसडीएम कार्यालयात लेखी अर्ज द्यावा. तोंडी तक्रारीपेक्षा लेखी तक्रारीला कायदेशीर वजन असते. अर्जाची प्राप्ती (acknowledgement) घ्यायला विसरू नका.
जर समोरचा व्यक्ती तरीही ताबा सोडत नसेल, तर दिवाणी न्यायालयात (Civil Court) दाद मागता येते. “ताबा परत मिळवण्यासाठी दावा” (Suit for Possession) किंवा “स्थगिती आदेश” (Injunction) मागता येतो. कोर्टाचा स्टे ऑर्डर मिळाला तर समोरचा व्यक्ती पुढील बदल करू शकत नाही.
कधी कधी परिस्थितीनुसार फौजदारी तक्रारही लागू शकते. जबरदस्तीने ताबा घेतला असेल, नुकसान केले असेल किंवा धमक्या दिल्या असतील तर IPC अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.
हे पण वाचा:- करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्या सवयी आवश्यक आहेत?
एक महत्त्वाची चूक अनेक लोक करतात. वर्षानुवर्षे शांत बसतात. पण लक्षात ठेवा, जास्त काळ दुर्लक्ष केल्यास समोरचा व्यक्ती “दीर्घकाळ ताबा” (Adverse Possession) चा मुद्दा उभा करू शकतो. त्यामुळे वेळेत कारवाई करणे खूप गरजेचे असते.
अशा प्रकरणात शक्य असेल तर अनुभवी वकिलाचा सल्ला घेणेही फायद्याचे ठरते. कारण प्रत्येक केसची परिस्थिती वेगळी असते.
सारांश एकच – बेकायदेशीर ताबा असेल तर स्वतः कारवाई करू नका, पुरावे मजबूत ठेवा, सरकारी नोंदी वापरा आणि कायदेशीर मार्गाने ताबा परत मिळवण्याचा प्रयत्न करा. योग्य पद्धतीने लढा दिला तर न्याय मिळू शकतो, जरी वेळ लागला तरी.
मी गेल्या 10+ वर्षांपासून Banking, Government Schemes, RTO, Property आणि Online Application संबंधित खऱ्या समस्यांवर सोपे व practical उपाय देण्याचं काम करतो. सामान्य लोकांना गुंतागुंतीच्या प्रक्रिया सोप्या मराठीत समजावणे हा माझा मुख्य उद्देश आहे.
1 thought on “मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा असल्यास काय करावे?”