ती चाळीशी पार केलेली होती आणि तो अजून तिशीच्या आतला… प्रेमाला वय नसतं म्हणतात…!

Premala Vay Naste: ती चाळीशी पार केलेली होती. आयुष्यात बरंच काही पाहिलेलं, सहन केलेलं, आणि तरीही पुन्हा उभं राहिलेलं मन तिच्याकडे होतं. तो अजून तिशीच्या आतला होता. चांगल्या कंपनीत नोकरी करणारा, वेगळ्या शहरात राहणारा, आयुष्याच्या धावपळीत नुकताच उतरलेला.

त्यांची ओळख फेसबुकवर झाली.

सुरुवातीला फक्त हाय-हॅलो. दोन-चार साध्या गप्पा. कोणताही हेतू नव्हता, कोणतीही अपेक्षा नव्हती. पण दिवसेंदिवस बोलणं वाढत गेलं. रोजचं चॅटिंग सुरू झालं. नकळत त्याच्या मनात तिच्याविषयी एक वेगळीच ओढ निर्माण होत गेली.

ती नवऱ्यापासून विभक्त झाली होती. एकटी राहत होती. आयुष्याने तिला आधीच बरंच शिकवलं होतं. त्यामुळे ती सगळं अगदी मैत्रीच्या चौकटीत ठेवत होती. तिला त्याच्याशी बोलायला आवडत होतं, कारण तो तिला समजून घ्यायचा, तिचं शांतपणे ऐकून घ्यायचा.

तो मात्र हळूहळू या मैत्रीपलीकडे विचार करू लागला.

एके दिवशी त्याने धीर करून स्पष्ट सांगितलं, “मला तू खूप आवडतेस. माझं मन तुझ्यावर जडलं आहे.”

हे ऐकून ती थबकली. तिच्या मनात एकाच वेळी अनेक प्रश्न उभे राहिले. तिने त्याला स्पष्ट सांगितलं, “वेडा झालास का? माझं वय काय आणि तुझं वय काय. मी खूप जगलेय, खूप तुटलेय. तूला अजून पुढचं आयुष्य जगायचं आहेस.”

पण तो ठाम होता. त्याचं उत्तर ठरलेलं होतं. “प्रेमाला वय नसतं. मला तू आवडतेस आणि हेच माझ्यासाठी खरं आहे.”

यानंतर त्याने तिच्यावरचं प्रेम शब्दांत आणि कृतीतून दाखवायला सुरुवात केली. कधी काळजी घेऊन, कधी प्रेमाने बोलून, तर कधी “तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस” हे सांगून. एकदा तो आजारी पडला. दवाखान्यात ऍडमिट झाला. तेव्हा त्याने तिला मेसेज केला, “मला काही झालं तर त्याला तूच जबाबदार राहशील, कारण मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करतो.”

हे सगळं पाहून तिचं मन हळूहळू विरघळायला लागलं. तिला वाटू लागलं, इतकं नितळ, इतकं निःस्वार्थ प्रेम मिळतंय, तर ते सतत दूर का ठेवायचं? खूप विचार करून, मनाशी झगडून तिने शेवटी होकार दिला.

त्या दिवसानंतर त्यांची छोटीशी दुनिया तयार झाली. सकाळी उठल्यावर पहिला मेसेज आणि रात्री झोपण्यापूर्वी शेवटचं बोलणं. शब्दांमधूनच त्यांनी एकमेकांत आपलं घर बांधलं.

दोघांनी भेटायचं ठरवलं. स्वप्नं विणली. पण परिस्थिती, जबाबदाऱ्या आणि अडचणी यांच्या पायात भेटणं सतत अडकलं. तरीही ती आशेवर होती. आज नाही तर उद्या भेट होईल, असं तिला वाटायचं.

आणि मग एक दिवस सगळंच बदललं.

त्याने अचानक बोलणं बंद केलं. कोणतंही कारण नाही, कोणतंही स्पष्टीकरण नाही. मेसेज वाचले जात होते, पण उत्तर येत नव्हतं. फोन केला तर उचलला जात नव्हता.

सुरुवातीला ती घाबरली. “काही अडचण तर नसेल ना? तो पुन्हा आजारी तर नाही ना?” असं वाटून ती प्रयत्न करत राहिली. मेसेज करत राहिली. विचारत राहिली. पण समोरून फक्त शांतता.

हळूहळू ती शांतता तिला आतून पोखरायला लागली. ज्या मनाने तिने एकदा स्वतःला सावरलं होतं, तेच मन पुन्हा तुटू लागलं. ती स्वतःला समजावत होती, कदाचित त्याच्याकडे काही कारण असेल. पण मनाला कारणांची गरज नसते, त्याला फक्त उत्तर हवं असतं.

रात्री-रात्री ती जुने चॅट्स वाचायची. त्याने कधीकाळी लिहिलेले शब्द तिच्या डोळ्यांत पाणी आणायचे. एकेक करून तिचा विश्वास तुटत गेला.

आधी नवऱ्याच्या नात्यातून ती जखमी झाली होती. आणि आता ज्या माणसावर तिने दुसऱ्यांदा मन ठेवलं, त्याच्याच शांततेने ती पुन्हा कोसळली होती. तिच्या मनात एकच प्रश्न घोळत राहिला, प्रेम खरंच असतं का, की ते फक्त काही दिवसांचा मोह असतो?

आजही तिच्या मनाचा एक कोपरा त्याची वाट पाहतो. कधीतरी एक मेसेज येईल, एक फोन येईल, आणि तो म्हणेल, “माफ कर, मला काही कारण होतं.” पण दिवस जातात, वेळ पुढे सरकतो, आणि त्या वाट पाहणाऱ्या डोळ्यांत फक्त पोकळी वाढत जाते.

आता तिच्यासाठी प्रेम म्हणजे आनंद राहिलेला नाही. ते एक अपूर्ण प्रश्न बनून राहिलं आहे. खरंच प्रेमाला वय नसतं का, की वय वाढलं की जखमा दुप्पट खोल होतात?

नाती जुळतात तेव्हा वय, अनुभव, भूतकाळ या सगळ्यापलीकडे जाऊन मन एकमेकांशी जोडली जातात, असं आपण नेहमी म्हणतो. पण प्रत्यक्ष आयुष्यात हे जोडलेपण किती नाजूक असतं, याची जाणीव अनेकदा फार उशिरा होते.

संदर्भ:- सोशल मीडिया वरील काही वायरल पोस्ट वरून.

1 thought on “ती चाळीशी पार केलेली होती आणि तो अजून तिशीच्या आतला… प्रेमाला वय नसतं म्हणतात…!”

Leave a Comment