विमान उतरलं… पण आत एकही जिवंत नव्हतं- अशी घडली ही अंगावर काटा आणणारी विमान दुर्घटना

Viman Durghatna Saudia Flight 163: एखादं विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरल्यावर आपण गृहित धरतो की आता धोका संपला. प्रवासी सुखरूप असतील, बचाव पथक पोहोचेल आणि काही वेळात सगळं सुरळीत होईल. पण एक अशी घटना घडली आहे, जिथे विमान यशस्वीपणे लँड झालं होतं… परंतु आत बसलेला एकही माणूस जिवंत नव्हता.

हे ऐकताना क्षणभर विश्वास बसत नाही. पण ही कल्पना नाही, अफवा नाही, तर विमान वाहतुकीच्या इतिहासातील एक भीषण सत्य आहे.

१९ ऑगस्ट १९८०, मंगळवार, हा दिवस आजही एव्हिएशन इंडस्ट्रीसाठी धक्का देणारा मानला जातो.

त्या दिवशी सौदी अरेबियातील रियाध आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौदिया एअरलाईन्सचं फ्लाइट १६३ सुरक्षितपणे उतरलं होतं. बाहेरून पाहिलं असता विमानाला मोठं नुकसान झालेलं दिसत नव्हतं. कोणताही स्फोट झाला नव्हता, विमान धावपट्टीवरून घसरलेलं नव्हतं, किंवा कोसळलेलंही नव्हतं. तरीही, त्या विमानातील सर्व २८७ प्रवासी आणि १४ क्रू मेंबर्स मृत आढळले.

सौदिया फ्लाइट १६३ नेमकं कुठून निघालं होतं?

हे Lockheed L-1011-200 TriStar प्रकारचं प्रवासी विमान होतं. पाकिस्तानातील कराची येथील कायद-ए-आझम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ते सौदी अरेबियातील जेद्दाहकडे जाणार होतं. रियाध येथे इंधन भरण्यासाठी थांबा होता.

संध्याकाळी ६:३२ वाजता विमानाने कराचीहून उड्डाण केलं. रियाधला पोहोचल्यावर नियोजित थांबा घेऊन इंधन भरलं गेलं आणि रात्री ९:०८ वाजता विमान जेद्दाहकडे रवाना झालं.

सगळं काही अगदी नियोजनाप्रमाणे सुरळीत चालू होतं.

उड्डाणानंतर काही मिनिटांतच संकट

रियाधहून उड्डाण झाल्यानंतर साधारण सात मिनिटांनी कॉकपिटमध्ये एक चेतावणी आली. कार्गो भागातून धूर येत असल्याचा संकेत मिळाला. सुरुवातीला क्रू मेंबर्सनी त्याची खात्री करण्याचा प्रयत्न केला. पण धूर कमी होण्याऐवजी वाढतच गेला.

चार मिनिटांनंतर परिस्थिती गंभीर होत असल्याचं स्पष्ट झालं. कॅप्टन खोयटर यांनी विमान परत रियाधला नेण्याचा निर्णय घेतला. रात्री ९:२० वाजता एअर ट्रॅफिक कंट्रोलला आपत्कालीन परिस्थितीची माहिती देण्यात आली.

या दरम्यान, ऑपरेटिंग केबलमधून आग पसरत होती. नंबर दोन इंजिनचा थ्रस्ट लीव्हर जाम झाला होता. तरीही पायलट्सनी अत्यंत संयम आणि कौशल्याने विमान नियंत्रणात ठेवलं.

यशस्वी लँडिंग… पण धोका संपलेला नव्हता

विमानाने जवळजवळ ४,००० मीटर लांबीची संपूर्ण धावपट्टी वापरून हळूहळू लँडिंग केलं. धावपट्टीच्या शेवटी टॅक्सीवेवर ते थांबलं. तिथे आधीच फायर ब्रिगेड आणि बचाव पथक तैनात होतं.

बाहेरून पाहिलं तर विमानाला फारसं नुकसान झालेलं दिसत नव्हतं. आग बाहेर पसरलेली नव्हती. त्यामुळे सर्व काही नियंत्रणात असल्याचा आभास निर्माण झाला.

पण आत परिस्थिती वेगळी होती.

विमान थांबल्यानंतर लगेच प्रवाशांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. इंजिन पूर्णपणे बंद करणे, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणे यामध्ये मौल्यवान मिनिटं निघून गेली.

आत मात्र धूर वेगाने साचत होता. ऑक्सिजन कमी होत होता. आणि वेळ प्रत्येक सेकंदाला हातातून निसटत चालली होती.

दरवाजे उघडल्यावर समोर आलेलं भयावह वास्तव

जेव्हा अखेर विमानाचे दरवाजे उघडण्यात आले, तेव्हा जे दृश्य समोर आलं ते अंगावर काटा आणणारं होतं. विमानाचा संपूर्ण आतील भाग जळून खाक झाला होता. सीट्स, छत, कॉरिडॉर सगळं राख झालं होतं.

आणि सर्वात भयानक म्हणजे, आत असलेले २८७ प्रवासी आणि १४ क्रू मेंबर्स, धुरामुळे गुदमरून मृत झाले होते. एकही व्यक्ती जिवंत नव्हती.

हे विमान अपघाताने कोसळलं नव्हतं. ते यशस्वीपणे उतरलं होतं. पण निर्णय घेण्यात आणि कृती करण्यात झालेला थोडासा उशीर शेकडो लोकांच्या आयुष्यावर भारी पडला.

हा अपघात नव्हता, हा वेळेचा पराभव होता

आज विमान प्रवास हा सर्वात सुरक्षित मानला जातो, आणि तो खरंच सुरक्षित आहे. पण सौदिया फ्लाइट १६३ आपल्याला एक कठोर धडा देऊन गेलं. तंत्रज्ञान कितीही प्रगत असलं, तरी योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि तत्काळ कृती हाच खरा जीव वाचवणारा घटक असतो.

विमान सुरक्षितपणे लँड झालं होतं. पण आत जगायला वेळ उरला नव्हता.

अशा घटना फक्त इतिहासात नोंद होत नाहीत. तर त्या आपल्याला थांबवून विचार करायला भाग पाडतात.

संदर्भ:- Jim Thomson 2013 Report

अशाच प्रश्नांवर, अशाच अस्वस्थ करणाऱ्या सत्यांवर मी सतत लिहित राहतो. माझं लिखाण आवडलं असेल
तर Quora आणि Facebook वर मला नक्की follow करा.

2 thoughts on “विमान उतरलं… पण आत एकही जिवंत नव्हतं- अशी घडली ही अंगावर काटा आणणारी विमान दुर्घटना”

Leave a Comment